खळबळजनक ! घडी घालताच ५०० च्या नोटांचे पडले ‘तुकडे’, नागरिकांमध्ये एकच खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – घडी घालताच ५०० रुपयांच्या नटांचे तुकडे पडत असल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील विट्यात समोर आला आहे. यासंदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकांना प्रात्यक्षिक दाखवलं आहे. याची दखल रिझर्व बँकेने घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

असा समोर आला प्रकार

सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांच्या शेजारी राहणाऱ्या वृध्द महिला राहते. ही महिला मोलमजूरीचे काम करते. दरम्यान तिला दीड महिन्यांपुर्वी ७ हजार रुपये मिळाले होते. तिने हे पैसे कपाटात ठेवले होते. त्यानंतर बुधवारी या महिलेने ३५०० रुपये बाहेर काढले. आणि मिरची आणण्यासाठी ती बाहेर पडली. त्यावेळी पैसे देताना महिलेने पाचशेची नोट बाहेर काढली. तेव्हा एक नोट घडी पडून तिचा तुकडा पडला. त्यानंतर दुसरी नोट बाहेर काढली तेव्हा तिचेही असेच झाले. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने या नोटा तपासल्या तेव्हा असेच घडत गेले. त्यामुळे त्यांनी हा प्रकार अनिल राठोड यांना सांगितला. तेव्हा त्यांनी पाहिल्यावर घड्या घालताच नोटांचे तुकडे पडायला लागले.

बँक अधिकाऱ्यांना दाखवला प्रकार

अनिल राठोड यांनी लागलीच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत धाव घेतली. तेव्हा तेथे शाखाव्यवस्थापक महेश दळवी होते.त्याच्यासमोर जाऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे नोटा अशा प्रकारे कपाटात बंद असतात. परंतु त्यांना काही होत नाही. उष्णतेच्या किंवा केमीकलच्या संपर्कात नोटा येतात तेव्हा असा प्रकार घडतो असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे नोटबंदीनंतरत आलेल्या नोटा या पुर्वीच्या तुलनेत हलक्या दर्जाच्या आहेत. असंही मत शाखा व्यवस्थापकांनी मांडलं.

रिझर्व बँकेने दखल घ्यावी

राठोड यांना एका बाजूने तुटलेली नोट बदलून मिळाली. परंतु उर्वरित पैसे बदलून मिळणार नाहीत असे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु बॅंक अधिकाऱ्यांच्या मतामुळे राठोड यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे रिझर्व बँकेने या प्रकाराची दखल घ्यावी अशी मागणी राठोड यांनी केली आहे.

शहरात प्रचंड खळबळ

हा प्रकार नागरिकांना समजताच एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी आपल्या नोटा मोडून सुट्टे करण्याचे प्रकार सुरु केले आहेत.