सांगली जिल्ह्यातील आठजण हद्दपार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मिरजेतील तीन तर इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीतील पाचजणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मिरजेतील अजय माने टोळीला सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तर इस्लामपुरातील प्रकाश पुजारी टोळीला सांगली, सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

मिरजेतील अजय अशोक माने (वय 22, रा. मालगाव रस्ता, मिरज), प्रवीण उर्फ राहुल सदाशिव जाधव (वय 23, रा. तुंग), राहुल ऊर्फ अण्णा अर्जुन माने (वय 27, रा. दत्तनगर, मिरज) यांना हद्दपार करण्यात आले आहे. तर इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीतील प्रकाश महादेव पुजारी, (वय 30, रा. इस्लामपूर), राकेश चलन कुचीवाले (वय 28, रा. माळगल्ली, इस्लामपूर), अनिकेत नरसगोंडा खोत (वय 19, रा. साखराळे), सुमित ऊर्फ बबलू मारूती हुलेनवार (वय 19, रा. माळगल्ली, इस्लामपूर), अजित शंकर पाटील (वय 22, रा. इस्लामपूर) यांना हद्दपार करण्यात आले आहे.

मिरजेतील अजय माने टोळीवर मिरज, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, कर्नाटकातील चिकोडी आदी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. माने त्याची टोळी तयार करून दुचाकी चोरी, मालमत्ता चोरी, धमकावणे, शिविगाळ करणे आदी 8 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर वारंवार कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे या टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव मिरज शहर पोलिस ठाण्याने दिला होता. मंगळवारी अधीक्षक शर्मा यांनी या टोळीला चार जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.

इस्लामपूर येथील प्रकाश पुजारी यानेही एक टोळी तयार केली आहे. या टोळीविरोधात खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दमदाटी, घातक शस्त्रे बाळगणे, सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करणे असे 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर वारंवार कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे इस्लामपूर पोलिस ठाण्याने या टोळीला हद्दपार करण्याचा प्रस्ताव अधीक्षक शर्मा यांच्याकडे पाठवला होता. अधीक्षक शर्मा यांनी या टोळीला दोन जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. अधीक्षक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, विशाल भिसे यांनी ही कारवाई केली.

Visit : policenama.com