ग्रामपंचायत सदस्याच्या खून प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी कार्याध्यक्षासह 13 जणांवर FIR

कवठेमहांकाळ : पोलिसनामा ऑनलाईन – उपसरपंच निवडीच्या वेळी बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्दन काळे यांच्या खून प्रकरणी तालुका युवक राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष गणपती नामदेव पाटील यांच्यासह १३ जण आणि इतर अनोळखी १५ ते २० व्यक्तींविरोधात पोलिसांनी कवठेमहांकाळ गुन्हा दाखल केला आहे.

भाजपच्या ३९ जणांविरोधात यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या वेळी झालेल्या हाणामारी प्रकरणी प्रकाश वसंत पाटील यांनी आणखी एक फिर्याद दिली आहे. त्यानुसार आज राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीर पध्दतीने जमाव जमिवला. उपसरपंच निवडणुकीच्या कारणावरून प्रकाश वसंत पाटील व तुकाराम उत्तम पाटील यांना अमोल वसंत पाटील, किरण नामदेव पाटील, श्रीकांत भाऊसाहेब पाटील यांनी काठ्यांनी मारहाण कल्याचे प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

राजेश रामचंद्र पाटील याने ढकलून खाली पाडल्यानंतर वसंत विष्णू पाटील व राहुल भानूदास पाटील या दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर तुकाराम पाटील यांना माधवराव विष्णु पाटील याने काठीने मारले. सुबराव विठ्ठल पाटील, अनिल शंकर परीट, विशाल विजय पाटील, वैभव विजय पाटील व संजय आनंदराव जाधव यांनी त्यानं लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यासोबत आलेल्या १५ ते २० लोकांनी पॅनेलच्या सदस्यांना व समर्थकांना शिवीगाळ व दमदाटी करुन त्यापैकी काहींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे.