वडिलांच्या मित्राचा चाकूने भोसकून खून, एकाला जन्मठेपेची शिक्षा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – पन्नास रुपये न दिल्याच्या कारणावरून वडिलांच्या मित्राचा चाकूने वार करून खून केल्या प्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश दत्तात्रय सातवलेकर यांनी सुनावली. अंकुश दादासो शिंदे असे त्याचे नाव आहे. ही घटना ९ फेब्रुवारी २०१४ रोजी तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे घडली होती.

अंकुश शिंदेचे वडील आणि मृत पांडुरंग शिरतोडे यांची मैत्री असल्याने शिरतोडे यांच्याशी अंकुशची ओळख झाली होती. घटनेच्या आधी ८ फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास अंकुश शिरतोडे यांच्या घरी गेला. त्याने त्यांच्याकडे पन्नास रुपये उसने मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार देताच अंकुशने त्यांच्याशी भांडण केले. याचा राग अंकुशच्या मनात होता. दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी अंकुश पुन्हा शिरतोडे यांच्या घरी गेला. रात्री झालेल्या भांडणांबाबत त्यांची माफी मागितली.

याशिवाय भूक लागल्याचे सांगून त्यांच्याकडे जेवणाची मागणी केली. पांडुरंग त्यांचा मित्र संजय बिरनाळे आणि अंकुश यांनी कवठेएकंद येथे त्यांच्या घरी एकत्रितपणे जेवण केले. त्यानंतर अंकुशने गोड बोलत पांडुरंग यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने पांडुरंग यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्यावर चाकूने सपासप निर्घृण वार केले. यामध्ये पांडुरंग गंभीर जखमी झाले.

दरम्यान, गावातील एका व्यक्तीने घडलेला प्रकार पाहून पांडुरंग यांच्या घरी प्रकार सांगितला. त्यानंतर पांडुरंग यांची पत्नी, मुलगा आणि मेव्हणा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पांडुरंग हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तात्काळ सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत पांडुरंग यांची पत्नी शारदा यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अंकुश शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंचनामा, साक्षीपुरावे गोळाकरून आरोपी अंकुशच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातवलेकर यांच्यासमोर सुरु होती. त्यांनी सर्व साक्षी पुरावे ग्राह्य धरत आरोपी अंकुश शिंदे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

परिपूर्ण ‘आहारासाठी’ खूपच काटेकोरपणा चांगला नाही

चयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा