स्वाभिमानीला ‘ती’ जागा सोडू नका अन्यथा पक्ष कार्यालयाला टाळे लावू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देणार असल्याच्या चर्चेमुळे सांगली येतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी थेट महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांना साकडे घेतले आहे. सांगलीची जागा अन्य कोणालाही देऊ नये अशी गळ घातली आहे. सांगलीची जागा स्वाभिमानी पक्षाला सोडण्याच्या चर्चेने संतप्त कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आज सकाळी कॉंग्रेस समितीसमोर एकच गर्दी केली. सांगलीची जागा सोडली तर पक्ष कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.

सांगलीच काँग्रेसच्या उमेदवारीसाठी धडपड

दरम्यान भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची फक्‍त औपचारिकता बाकी आहे. त्यांना तोडीस तोड उमेदवार शोधण्याची काँग्रेसची धडपड सुरु आहे. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, पक्षाचे शहर-जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी आपण इच्छूक नसल्याचे कळविले आहे.

आमदार विश्‍वजीत कदम यांनी लोकसभा लढवावी असाही आग्रह आहे, पण ते इच्छूक नसल्याचे समजते. त्यातच दादा व कदम गट हा वादही येथे अडथळा आहे. पराभवाचे पाणी सपाटून प्याल्यानंतरही काँग्रेसजनांत सुजाणतेची चिन्हे नाहीत. या दुहीची व कमकुवतपणाची दखल पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरुन घेतली गेल्याची चर्चा आहे. सुरवातीला नगरच्या बदल्यात सांगलीची जागा राष्ट्रवादीसाठी सोडली जाण्याची चर्चा होती. हातची संधी जाण्याच्या भितीने काँग्रेसजनांनी महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जऊून खर्गे यांच्याकडे धाव घेतली आहे.

आगामी लोकसभेत हातची संधी जाण्याच्या भितीने कॉंग्रेसजनांनी महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जऊून खर्गे यांच्याकडे धाव घेतली आहे. जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण ) आमदार मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, आमदार विश्‍वजीत कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, कार्यकारीणी सदस्या जयश्री पाटील, कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांनी पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून कॉंग्रेसने सांगलीची जागा २०१४ चा अपवाद करता कधीही गमावलेली नाही. जिल्ह्यात तळागाळापर्यंत पक्षाची मुळे पसरली आहेत. जागावाटपात पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षाला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत; यामुळे संघटन खिळखिळे होण्याची भिती आहे.