Coronavirus : सांगलीकरांना मोठा दिलासा ! ‘त्या’ 24 जणांची ‘कोरोना’ची दुसरी टेस्ट ‘निगेटिव्ह’

पोलिसनामा ऑनलाईन टीम –   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच सांगलीतील मिरज येथे अचानक 25 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी काल 24 रुग्णांची दुसरी चाचणी नेगेटिव्ह आल्याने मोठे यश मिळाले आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होऊ नये यादृष्टीने मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात आले. सांगली येथे 25 कोरोना रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 24 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना 14 दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

सांगली जिल्हा कोविड मुक्त करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आपण गाठला आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना दिल्या त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी, मुंबईतील जे. जे. समूह रुग्णालयाच्या कोरोना समन्वयक विनिता सिंगल, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने,सांगलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नानंदकर यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे यश मिळाल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.
—————————————————