सांगली महापालिकेत सत्तापरिवर्तन ! महापौरपदी राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी, जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली मिरज कुपवाड महापालिकेत सत्तापरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपला अस्मान दाखवलं आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा जोरदार धक्का असल्याचं बोललं जात आहे.

भाजपची 6 मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं आहे. तर 2 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं आघाडीच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता. राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांना 39 मतं मिळाली तर भाजपच्या धीरज सु्र्यवंशी यांना 36 मतं मिळाली. दिग्विजय सुर्यवंशी यांनी 3 मतांनी धीरज सु्र्यवंशी यांचा पराभव केला.

फोडाफोडीच्या शक्यतेमुळं उत्सुकता शिगेला

4 उमेदवारांपैकी दोघांनी माघार घेतल्यानं सांगली महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी आणि भाजपच्या धीरज सुर्यवंशी यांच्यात मुख्य लढत झाली. नगरसेवक फोडाफोडीच्या शक्यतेमुळं महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. भाजपचे 7 नगरसेवक अंतिम क्षणापर्यंत नॉट रिचेबल होते. त्यामुळं बहुमत असूनही भाजपला सत्ता टिकवण्यासाठी धडपड करावी लागली जी अखेर व्यर्थ ठरल्याचं दिसलं.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील पक्षीय बलाबल (एकूण जागा – 78)

भाजप – 41
अपक्ष – 2
काँग्रेस – 20
राष्ट्रवादी – 15

सत्ताधारी भाजपमध्ये फूट

सांगलीत सत्ताधारी भाजपमध्ये महापौर-उपमहापौर निवडीवरून फूट पडल्याचं आधीच स्पष्ट झालं होतं. 9 नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आणि ते नॉट रिचेबल झाले होते. बैठकीला 30 ते 32 नगरसेवकच उपस्थित होते. त्या रात्री 3 नगरसेवकांना शहराबाहेर जाण्यापासून रोखण्यात भाजपला यश आलं. त्यानंतर रात्री उशीरा 3 नगरसेकांना गोवा सहलीवर पाठवण्यात आलं.