सांगलीत महापालिका कर्मचार्‍यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, शरीराराचे लचके तोडत केले रक्तबंबाळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सांगली महापालिकेचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. कुत्र्यांनी संपूर्ण शरीराचे लचके तोडल्याने ते रक्तबंबाळ झाले आहेत. शुक्रवारी (दि. 14) सकाळी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर त्यांना त्वरीत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

श्रीकांत मद्रासी असे जखमी कर्मचा-याचे नाव आहे. मद्रासी हे सांगली महापालिकेत स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे प्र. क्रमांक 19 याठिकाणी गेले होते. यावेळी त्यांना रस्त्यावरील काही भटक्या कुत्र्यांनी अचानक घेरले. यावेळी त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण टोळीतील चवताळलेल्या एका कुत्र्याने मद्रासी यांच्यावर झेप घेत त्यांना खाली पाडून दिले. मद्रासी खाली पडताच या कुत्र्याने त्यांच्या चेहऱ्यावर चावा घेत शरीराचे लचके तोडले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसापासून सांगली, मिरज आणि कुपवाड या परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. यापूर्वीही मिरज शहरात अनेकदा भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला केला आहे. दरम्यान नागरिकांवर हल्ला करणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.