सांगली महापालिका निवडणुक : राजकीय वातावरणाने मिरज ,कुपवाड आणि सांगली निघाली ढवळून

सांगली : पोलिसनामा ऑनलाइन

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. मागील काही दिवसांपासून शहरात सुरु असलेला जोरदार प्रचार, पदयात्रा, गाठीभेटी, स्नेहभोजन, हळदी-कुंकू समारंभ, कॉर्नर बैठका आता बंद होणार आहेत. तिन्ही शहरे राजकीय वातावरणाने ढवळून निघाली असून सोमवारी रात्री व मंगळवारी गुप्त प्रचार जोरात होणार असल्याची दबकी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरु आहे.

[amazon_link asins=’B01MTCFWKM,B01G7D9BQ2,B075MHBDN4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’27ec6804-933e-11e8-a638-a5a0bf343044′]

सांगली, मिरज , कुपवाड महानगरपालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक दि. 1 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे. या निवडणुकीत एकूण 20 प्रभागात 541 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने गेले वर्षभर इच्छुक उमेदवारांकडून तयारी सुरू होती; पण प्रत्यक्ष प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आणि अनेक बदल पाहायला मिळाले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणुकीचे वातावरण खर्‍या अर्थाने तापले होते. गेल्या महिन्यापासून तर नागरिक प्रचारातील धडाका पाहत आहेत. भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादीतीलनेत्यांसह दिग्गज मंत्री व नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना पाहायला मिळाल्या.

शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर, नितीन बानुगडे-पाटील, रामदास कदम, अभिनेते आदेश बांदेकर यांच्या तोफा धडाडल्या. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील यांनी किल्ला लढवला तर , राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभांनी शहरे दणाणून सोडली. तर भाजपकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ यांची प्रचारसभा गाजवल्या.

यावेळी प्रचारसभेत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा व्यक्तिगत व पक्षीय आरोप-प्रत्यारोप करत प्रचार आणि भाषणे गाजवली. जुने मित्र असलेले काँग्रेस व राष्ट्रवादीने भाजप व शिवसेनेला या निवडणुकीत टार्गेट केले, तर भाजपच्या नेत्यांनी दोन्ही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. तसेच भाजप व शिवसेना या मित्रपक्षातील नेत्यांनी आपापसात जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. या निवडणुकीकरिता बुधवारी मतदान होत असून शुक्रवारी निकाल जाहीर होणार आहेत.