सांगली : कसबे डीग्रज येथे महिलेचा खून करून, एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे महिलेचा खून करून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. जयश्री काशिनाथ पवार (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. जयश्री चा खून केल्यानंतर संशयिताने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. संशयितावर सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

फिरोज उर्फ गोट्या नरदेकर (वय 30 ) असे संशयितांचे नाव आहे. जयश्री यांच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. तिला दोन मुली, एक मुलगा आहे. जयश्री यांच्या घरासमोरील प्लॉटमध्ये गोट्याचा गोठा आहे. जयश्रीच्या पतीच्या मृत्यूनंतर या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. गोट्याही विवाहित आहे. त्याच्या कुटुंबियांना या समबंधाची कल्पना होती. गोट्या राजरोसपणे जयश्री च्या घरी जात – येत होता. दोघे एकत्र फिरतही होते.

त्या दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत सर्वानाच कल्पना होती. सोमवारी जयश्री ची तीनही मुले शाळेत गेली होती. त्यावेळी गोट्या तिच्या घरी गेला. त्यानंतर त्याने जयश्रीचा टॉवेलने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाशेजारी बसून विष प्राशन केले. नंतर त्याने स्वत: 108 क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी त्याला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

जयश्रीची मुले शाळेतून घरी आल्यावर तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. मुलांचा आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले. त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनंतर पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, सहाय्यक निरीक्षक देसाई, संतोष माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गँभीर दुखापतीचे गुन्हे दाखल आहेत.