राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा भरदिवसा निर्घृण खून, सांगली जिल्ह्यात खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगलीतील एका बड्या नेत्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.10) दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. दत्तात्रेय पाटोळे असे या नेत्याचे नाव असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. सांगली जिल्हा आज दुपारी हादरून गेला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांची तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून केला.

मिरज औद्योगिक वसाहतीतील रोहिणी कोल्ड स्टोरेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या खूनाच्या घटनेनं सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आर्थिक वादातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाटोळे यांचा खून करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

खुनाची घटना समजताच नातेवाईकांनी व काही कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटना स्थळी दाखल झाला असून हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे. पोलिसांकडून स्थानिक नगारिकांकडून माहिती घेतली जात आहे. स्थानिक नागरिकांनी हल्लेखोर दोन ते तीन असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.