Sangli News : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. येथील जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहरापासून काही अंतरावर असलेल्या बिरनाळ तलावात ही घटना घडली. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या तरुणाचे नाव विनायक वसंत कलाल (वय २०, रा. संभाजी चौक, जत) असे आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक कलाल हा जत शहरातील शेगांव रोड येथे एका गॅरेजमध्ये कामाला होता. सुट्टी असल्याने आपल्या ५ मित्रांसोबत विनायक हा पोहण्यासाठी बिरनाळ तलाव येथे गेला होता. त्यातील ४ मित्र हे पोहत पुढे गेले आणि विनायकला पोहता येत नसल्याने ते तलावाच्या कडेला उभा राहून अंघोळ करत होता. दगडावर असलेल्या शेवाळवरून विनायकचा पाय घसरला. यानंतर विनायक पाण्यात बुडू लागला. जवळ पोहत असलेल्या मित्राला विनायक हा पाण्यात बुडत असल्याचे दिसून आले. त्याने विनायकचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण पाण्याची खोली भरपूर असल्याने विनायकचा जीव वाचवू शकला नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती विनायकच्या मित्राने जत पोलिस ठाण्यात दिली. तात्काळ घटनास्थळी तहसीलदार सचिन पाटील, पोलिस निरीक्षक उत्तम जाधव, पोलिस नाईक बजरंग थोरात, सचिन जवजांळ, वहिदा मुजावर, तलाठी रवींद्र घाटगे, युवक नेते विक्रम ढोणे, युवक नेते योगेश मोटे, युवक नेते योगेश व्हनमाने, कोतवाल सुभाष कोळी, बंडा कांबळे, नगरपरिषदेचे कर्मचारी विजय माळी, मुरली माळी, यशवंत माळी, अजित टेगले आदीजन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शोधण्यासाठी संतोष कोळी व अन्य दोन सहकाऱ्यांसोबत पाण्यात उतरून मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले पण पाण्याची खोली जास्त असल्याने रात्री उशिरापर्यत विनायकचा मृतदेह हाती लागला नव्हता. याशिवाय रात्री उशिरापर्यत मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. हा घटनेने जत शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच अमोल कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले.