Sangli : धक्कादायक ! दीड दिवसांपुर्वी जन्मलेल्या मुलाचा निर्दयी मातेनं गळा आवळला

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन – आईनेच केवळ ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या पोटच्या मुलीचा गळा घोटून खून केला. उपचारादरम्यान या दुर्दैवी बालिकेचा मृत्यू झाला. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. तिने पोटच्या गोळ्याचा गळा का आवळला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (वय ३०, रा. यलापूर, जि. बेळगाव) असे निर्दयी आईचे नाव आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात आईविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित्रा जुट्टी ही महिला पाच दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. ४१ तासांपूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. शनिवारी रात्री सुमित्राने हॉस्पिटलमध्येच बालिकेचा गळा आवळला. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिलेने हा प्रकार पाहिला. तिने याची माहिती वॉर्डमधील डॉक्टरांना दिली. त्यांनतर परिचारिकांनी उपचारासाठी बालिकेला ताब्यात घेतले.

बालिकेच्या गळ्यावर हाताचे व्रण आढळले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तातडीने बालिकेवर उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी रात्री बालिकेचा मृत्यू झाला. याबाबत सुमित्राला विचारणा केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी रूग्णालयाने विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मध्यरात्री सुमित्रावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तिची चौकशी सुरू आहे.