सांगली : बँक ऑफ इंडियाला भरपाई देण्याचे आदेश

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – गहाणपत्र वेळेत न दिल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल बँक ऑफ इंडियाने कर्जदाराला ९२ हजार रूपये भरपाई ३० दिवसात देण्याचे आदेश सांगलीतील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.

विजय लाड यांनी कुपवाड एमआयडीसी येथील प्लॉट २००५ मध्ये भाडेपट्ट्याने घेतला होता. त्यासाठी त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या पटेल चौक शाखेत मूळ तारणगहाण दस्त इक्विटेबल मॉर्गेजद्वारे ठेवला होता. त्यांनी हे कर्ज भागवून अन्य बँकेकडे ७५ लाख रूपये कर्जाची मागणी केली होती. दुसर्‍या बँकेने एमआयडीसीकडून घेतलेल्या प्लॉटच्या मूळ भाडेपट्टा दस्ताची मागणी केली होती.

लाड यांनी बँक ऑफ इंडियाकडे कर्जापोटी तारण ठेवलेल्या त्या दस्ताची मागणी केली. बँकेने दस्त देण्यास टाळाटाळ केली म्हणून त्यांनी अ‍ॅड. धावते यांच्यामार्फत ग्राहक न्यायालयात तक्रार केली. हा दावा सुरू असताना बँक ऑफ इंडीयाला तो भाडेपट्टा सापडला. दरम्यानच्या काळात लाड यांनी इक्विटेबल मॉर्गेज ऐवजी तारणगहाण दस्त करून दुसर्‍या बँकेकडून कर्ज घेतले होते.

बँक ऑफ इंडीयाने वेळेत दस्त दिला असता तर ३ हजार रूपये खर्चात इक्विटेबल मॉर्गेज करून कर्ज उचलता आले असते. वेळेत दस्त न मिळाल्याने त्यांना ८० हजार रूपये खर्चून तारणगहाण दस्त करावा लागला. या नुकसानीबद्दल ७७ हजार ४८० रूपये, ग्राहकाला दुषित सेवा दिल्याबद्दल १० हजार रूपये व अर्जाचा खर्च म्हणून ५ हजार रूपये बँकेने विजय लाड यांना देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले.