इस्लामपूरजवळ गावठी पिस्तूल, चाकू जप्त ; कर्नाटकातील दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली-इस्लामपूर रस्त्यावर वाळवा फाटा येथे देशी बनावटीचे पिस्तूल, धारदार चाकू घेऊन फिरणार्‍या दोघांना अटक करण्यात आली. ते दोघेही कर्नाटकमधील आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. एक पिस्तूल, एक काडतूस, चाकू, दोन मोबाईल, मोटारसायकल असा एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश दाजी गाढवे (वय 28), सुजिर भिवा भिसे (वय 24, दोघेही रा. सिद्धापूर, जि. विजापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातक शस्त्रे घेऊन फिरणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार शाखेचे निरीक्षक पिंगळे यांचे एक पथक इस्लामपूर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी हवालदार अशोक डगळे यांना दोघेजण मोटारसायकलवरून वाळवा फाटा येथे येणार असल्याची तसेच त्यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली. त्यांनी ही माहिती निरीक्षक पिंगळे यांना सांगितली. पिंगळे यांनी तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार गाढवे व भिसे यांना वाळवा फाटा परिसरात ताब्यात घेतले. गाढवे याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ पिस्तूल, काडतूस, एक मोबाईल सापडला. तर भिसेकडे धारदार चाकू, मोबाईल सापडला. त्यानंतर तातडीने दोघांना अटक करण्यात आली. त्यांना इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक डगळे, सचिन धोत्रे, वैभव पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Visit : policenama.com