सांगली पोलिस दलात ई-संवाद कार्यप्रणाली सुरू : पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्हा पोलिस दलात आजपासून ई-संवाद (व्हिडिओ कॉन्फरन्स) कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यामधून या प्रणालीद्वारे पोलिस अधीक्षकांकडे थेट तक्रारी मांडता येणार आहेत. परराज्यातील तसेच परदेशातील नागरिकांनाही याचा फायदा होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधीक्षक शर्मा म्हणाले, आंध्रप्रदेश येथील प्रकासम या जिल्ह्यात सध्या अशी प्रणाली सुरू आहे. त्याची माहिती मिळाल्यानंतर सायबरकडील पोलिस उपनिरीक्षक डी. एस. विटेकरी, संदीप नलवडे, प्रकाश पाटील यांना प्रशिक्षणासाठी प्रकासम जिल्ह्यात पाठवण्यात आले होते. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
त्यानंतर अधीक्षक शर्मा यांनी लोकांचे प्रश्न, तक्रारी यांचे निरसन करण्यासाठी ही प्रणाली सांगली जिल्ह्यात सुरू केली आहे. आजपासून (शनिवार) ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक थेट पोलिस अधीक्षकांशी संवाद साधू शकणार आहेत.

यापूर्वी दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे प्रत्येक पोलिस ठाण्यात आयोजन करण्यात येत होते. आता याच दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांनी शनिवारी संबंधित पोलिस ठाण्यात उपस्थित राहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्या तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे मांडाव्यात असे आवाहन जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.