सांगलीत युवकाकडून देशी बनावटीची ‘रायफल’ जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगलीत देशी बनावटीची बारा बोअर रायफल विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला अटक करण्यात आली. स्वप्नील संतोष फातले (वय 24, रा. इचलकरंजी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. युवकाकडून 25 हजार रुपये किमतीची रायफल जप्त करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी शस्त्रे तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे एक पथक शहरात गस्त घालत होते. त्यावेळी खिलारे मंगल कार्यालयाजवळ एक युवक अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पिंगळे यांना खबऱयाद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पोत्याची झडती घेतल्यानंतर त्यात देशी बनावटीची 12 बोअर रायफल सापडली. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर रायफल विक्री करण्यासाठी आल्याची कबुली त्याने दिली. त्याला अटक करण्यात आली.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंतम खाडे, जितू जाधव, सचिन कनप, अरुण सोकटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.