सांगलीतील माजी पदाधिकाऱ्याची टोळी हद्दपार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा येथील भाजपचा माजी पदाधिकारी प्रवीण माने (वय 29) याच्यासह सात जणांच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. सांगलीसह कोल्हापूर, सातारा तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मंगळवारी याबाबत आदेश दिले.

Sangli

दत्तात्रय कोळेकर (वय 27), अनिल गावडे (22), सचिन रास्कर (27), काशिनाथ ढोले (40), शोएब सनदी (20) उमेश रास्कर (27, सर्व रा. आष्टा) अशी टोळीतील अन्य गुन्हेगारांची नावे आहेत. टोळीविरोधात 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Sangali

प्रवीण माने हा भाजप युवा मोर्चाचा माजी जिल्हा उपाध्यक्ष आहे. तो या टोळीचा प्रमुख आहे. तो आष्टा आणि जवळच्या गावात मटका-जुगाराचा व्यवसायही चालवतो. स्वतः मटका बुकी मालक असून त्याच्याकडे इतर लोक एजंट म्हणून काम करतात. यासाठी त्याने टोळी तयार केली होती. सन 2011 पासून त्याची टोळी आष्टा व इस्लामपूर परिसरात कार्यरत होती.

बेकायदेशीर जमाव जमवून दमदाटी व मारहाण करणे, खूनाचा प्रयत्न, दुखापत करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, अवैध मटका-जुगार व्यवसाय असा 24 गंभीर गुन्हे टोळीविरोधात दाखल आहेत. टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तडीपाराचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पोलिस अधीक्षक शर्मा यांनी तो प्रस्ताव तातडीने मंजूर केला.

टोळीतील गुन्हेगारांना सांगलीसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन 1951 नुसार ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, विशाल भिसे, दीपक गट्टे, अवधूत भाट यांनी या कारवाईत भाग घेतला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/