सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Sangli Politics News | सांगली जिल्ह्यातील माजी चार आमदार लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. लवकरच मुंबईत हा पक्ष प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये जिल्ह्यातील शिराळ्यातील शिवाजीराव नाईक, कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्रअण्णा देशमुख आणि जतचे विलासराव जगताप यांचा समावेश आहे.
या माजी आमदारांच्या बरोबरच जत आणि आटपाडी तालुक्यातील काही प्रमुख भाजप पदाधिकारीही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यात नुकतेच भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या आटपाडीतील अनिल पाटील आणि जतमध्ये भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवलेल्या तमनगौडा रवी पाटील यांचाही समावेश असणार आहे.
या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यात अजितदादा पवार यांच्या पक्षाची ताकद वाढेल आणि त्याचा परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत दिसून येईल. दुसरीकडे शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक शरद पवार गटातच राहतील की अजित पवार गटात सामील होतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.