अबब ! सांगलीत डाळिंब 625 रुपये किलो ?

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – आटपाडी बाजार समितीमध्ये डाळिंबाला किलोला ( Per kg of pomegranate) तब्बल 625 रुपये एवढा विक्रमी दर मिळाला. निर्यातक्षम डाळिंबापेक्षा प्रथमच एवढा जास्त दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. 18) बाजार समितीच्या आवारात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. विक्रमी दर मिळाल्याने डाळिंब उत्पादक शेतक-यांंमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

आटपाडी बाजार समितीच्या आवारात दररोज डाळिंबाची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्स या पंढरीनाथ नागणे यांच्या डाळिंब सौद्यात पांडुरंग दत्तात्रय गायकवाड (रा. चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) या शेतकऱ्याच्या डाळिंबाला 625 रुपये प्रतिकिलो असा विक्रमी दर मिळाला. याशिवाय नामदेव बंडगर (रा. अनकढाळ) यांच्या डाळिंबाला 425 रुपये, सिद्धनाथ लक्ष्मण यमगर यांच्या डाळिंबाला 400 रुपये, मनसूर इनाम शेख (रा. बलवडी) यांच्या डाळिंबाला 525 रुपये असा दर मिळाला आहे.

दरम्यान, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड म्हणाले की, अतिवृष्टीने नव्वद टक्के बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे डाळिंबाची आवक कमी आहे. दिवाळीच्या सणामुळे मागणी मोठी आहे. व्यापाऱ्यांच्या स्पर्धेमुळे विक्रमी दर मिळत आहे.