म्हणे, शीतली अन आज्या येणारच… भामट्याने घातला हजारोंचा गंडा 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – झी वरील ‘लागिरं झालं जी’ मालिका खूप प्रसिद्ध झाली असून यातील कलाकारही लोकांच्या पसंतीस उतरले आहे. या मालिकेतील कलाकार कार्यक्रमाला घेऊन येतो असे सांगत एका भामट्याने आयोजकांकडून ५० हजार उकळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सांगलीत घडली असून सत्यापा मोरे असे या भामट्याचे नाव आहे. आपल्या कार्यक्रमात लोकांची गर्दी आणण्यासाठी नेहमी आयोजकांकडून अश्या प्रकारे कलाकारांना बोलावले जाते आणि यासाठी वाटेल तेवढे पैसे आयोजक देतात. याचाच फायदा घेत या भामट्याने पैसे उकळले असल्याचे समोर आले आहे.

वाळवा तालुक्यातील माळभागाच्या शिवाजी व्यायाम मंडळाने शहीद जवानांच्या स्मरणार्थ सुरेली हिंदी गीतों का ‘जागो हिंदुस्तानी’ नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्रीकांत गणगटे हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक होते. गणगटे यांची सत्यापा मोरेशी ओळख झाली. मला ५० हजार रुपये दिले तर मी ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकार धोंडीबा कारंडे, किरण राणे, निखिल चव्हाण, संदीप जंगम या सर्वांना आणतो, अशी थाप मारली. श्रीकांत गणगटे यांना हे खरे वाटले, म्हणून त्यांनी त्याला ५० हजार रुपये दिले. कार्यक्रम पत्रिकावर सर्व कलाकाराचे फोटो छापले व सोशल मीडियावर ही पत्रिका शेअर केली. कार्यक्रमासाठी १००, २०० आणि ३०० रुपये तिकीट दर ठेवण्यात आले.

या कार्यक्रमासंदर्भात कोणतीही कल्पना या कलाकारांना नव्हती. सोशल मीडियावर ही कार्यक्रमाची पत्रिका पाहिल्यानंतर ही बाब कलाकारांच्या लक्षात आली. याप्रकरणी अभिनेता आणि दिग्दर्शक धोडिंबा कारंडे यांनी सर्व कलाकारांच्यावतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, आयोजकांनी चूक मान्य करून फसवणूक झाल्याचे सांगितल्यावर गणगणे यांनी तक्रार मागे घेतली आहे.