सांगली : “क्रांती’च्या आसवणी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली जिल्ह्यातील कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या नियोजित आसवणी प्रकल्पावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून सहा कोटी रुपयांचे १८ लाख लिटर स्पिरीट जप्त केले. क्रांती सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या स्पिरीटची निर्मिती केली होती. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रकल्पाच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक किर्ती शेडगे यांनी सोमवारी (दि.२८) सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सांगली विभागाने केलेली ही कारवई आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे. क्रांती सहकारी साखर कारखान्याला मळी साठवणुकीचा परवाना दिला आहे. तसेच या कारखान्याने आसवणी प्रकल्प सुरु करण्याची परवानगी शासनाकडे मागितली होती. शासनाने ती मजूर केली आहे पण उत्पादन करण्याची परवानगी अद्याप दिलेली नाही. परवानगी नसताना देखील या कारखान्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पिरीटचे उत्पादन केले.

अधीक्षक श्रीमती शेडगे म्हणाल्या, कारखान्याला आसवणी प्रकल्प उभारणी करण्याची परवानगी मिळाली आहे. त्याचे काम पुर्ण झाले आहे. त्यांनी उत्पादनासाठी परवाना मागितला आहे. तो अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना स्पिरीट उत्पादन करता येत नाही. तरीही त्यांनी स्पिरीटचे उत्पादन केल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे तपासणी केली असता मोठ्या प्रमाणातील साठा सापडला आहे. प्रकल्पाचे मॅनेजर अनिल महादेव शिंदे (वय 50, रा. बोरगाव, ता. वाळवा) याला अटक करण्यात आली असून त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पात विनापरवाना उत्पादन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र कारखान्याने ही स्पिरीट उत्पादनाची चाचणी असल्याचा दावा केला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचे उत्पादन हे किमान पंधरा दिवसातील आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विट्याचे निरीक्षक मारुती पाटील हे या प्रकरणी तपास करत आहेत.