सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –   सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पाझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दरम्यान त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली होती. मेपासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अधीक्षक शर्मा जिल्हाभर फिरत होते. पोलिस दलाला कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. ते स्वतःही काळजी घेत होते. मात्र गणेशोत्सव, मोहरम या सणांवेळी झालेली धावपळ, सातत्याने होणार्‍या प्रशासकीय बैठका यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण होता.

त्यातच दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना घरातच अलगीकरण करण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान राज्यात गेल्या 24 तासात 258 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून राज्यात आतापर्यंत 13 हजार 446 पोलिसांना कोरोनाची लगण झाली आहे. त्यापैकी 16 हजार 401 कोरोनामुक्त झाले आहेत.