सांगलीत दोन बंद फ्लॅट फोडले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

शहरातील माधवनगर रस्ता परिसरातील मीरा हौसिंग सोसायटीतील दोन बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने, रोकड, दोन मोबाईल असा तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. शुक्रवारी दुपारी एक ते अडीचच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी संदीप रमेश रेडीज (वय 51) यांनी फिर्याद दिली आहे. रेडीज कुटुंबासमवेत मीरा हौसिंग सोसायटीत रहातात. शुक्रवारी दुपारी ते फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. तसेच त्यांच्या शेजारी राहणार्‍या शर्मिला खोतही त्यांचा फ्लॅट बंद करून बाहेर गेल्या होत्या. दुपारी अडीचच्या सुमारास रेडीज परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली.

[amazon_link asins=’B01LY8U33X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ccdb8626-7c40-11e8-972c-23000bdce54c’]

चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप, लॅच की तोडून आत प्रवेश केला. आतील कपाटात ठेवलेले चार तोळ्यांचे सोन्याचे तोडे, 3 तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस, प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, 6 ग्रॅमची एक अंगठी, 1 ग्रॅमचे सोन्याचे नाणे, 3 ग्रॅमी नथ, दोन हजार रूपयांची रोकड असा सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केल्याचे दिसून आले. रेडीज यांच्या शेजारी राहणार्‍या खोत यांचाही फ्लॅट फोडून दोन मोबाईल लंपास करण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. अपार्टमेंटपासून काही अंतरावर जाऊन श्‍वान तेथेच घुटमळले. तज्ज्ञांनी घटनास्थळी ठसेही घेतले आहेत. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.