सांगली : पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरताच रस्ते झाले सामसूम

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सांगली जिल्ह्यात काल रात्रीपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चक्क जिल्हा पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरले आहेत. गेले दोन दिवस पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम हे स्वतः रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारत आहेत.

सांगली शहरात कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. त्यातच अनेक कडक कारवाई देखील करत आहेत. तसेच, विनाकारण फिरणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने जप्त करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत विनंती करून देखील नागरिक सबळ कारण नसताना सुद्धा बाहेर पडत आहेत. यामुळे स्वत: पोलीस प्रमुखांनी कारवाई सुरू केली आहे. शहरात गर्दीत सुरू असलेली दुकाने बंद केली. बुधवारी महापालिका पथकाला बोलावून त्यांनी ९ दुकाने सील सुद्धा करण्यात आलीय. तसेच विनाकारण आणि बोगस पासवर फिरणाऱ्यांची वाहने जप्त करीत कारवाई सुरू केली आहे. स्वत: पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरून कारवाई करीत असल्याने रस्ते अधिक सामसूम झाले होते.

वाहनांवर अत्यावश्यक सेवा म्हणून मोठा कागद लावून फिरणाऱ्यांवर वाहन जप्तीची कारवाई करण्यात आली. प्रशासनाने अशी कोणालाही परवानगी दिली नसताना वाहनावर पास लावून फिरणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. बुधवार रात्रीपासून कडक लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला होता. दुकानात गर्दी असल्याने अधीक्षक गेडाम यांनी दुकाने सील केली. स्टेशन चौक, बालाजी चौक, पंचमुखी मारुती रोड, रिसाला रोड परिसरातून पायी चालत त्यांनी कारवाई केलीय. तसेच यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.