सांगली जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी ‘या’ 2 दिग्गज नेत्यांच्या नावाची चर्चा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्याच्या वाट्याला दोन मंत्रिपदे आली आहेत. त्यामुळे पालकमंत्री आता कोण होणार याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. या मंत्रिपदाच्या शर्यतीत अर्थमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम आहेत. यापैकी जयंत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद जाण्याचे चिन्ह दिसत आहेत.

राज्यात भाजपाची सत्ता असताना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख या जिल्ह्याबाहेरील नेत्यांकडे होते. त्याआधी आघाडी सरकारच्या काळात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पद डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे होते. दरम्यान सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे नेहमी जिल्ह्यातील नेत्याकडेच राहिले आहे. परंतु राज्यात भाजपाची सत्ता आल्याने ही परंपरा मोडीत निघाली आणि जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री सांगली जिल्ह्यास मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लोकांनी नाराजी दर्शविली होती. महापुराच्या काळात तत्कालीन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी नागरिकांकडे पाठ फिरविली त्यामुळे जनतेच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागला होता. बाहेरील नेत्यांकडे पालकमंत्री पद दिल्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला अशी चर्चा देखील भाजप सत्तेत असताना जिल्ह्यात होत होती.

जिल्ह्यात आता सत्तेचे समीकरण बदलले असून आता महाविकास आघाडीची सत्ता सांगली जिल्ह्यात आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याला एक कॅबिनेट मंत्रिपद लाभले आहे. तर राज्यमंत्री पद विश्वजित कदम यांच्याकडे आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यात आजवर सर्वात ज्येष्ठ नेता हा पालकमंत्री पदी विराजमान झाला आहे. त्या पार्श्वभूमीचा विचार केला तर ज्येष्ठ नेते म्हणून जयंत पाटील यांच्याकडेच पाहिले जाते. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी विश्वजित कदम यांच्यापेक्षा जयंत पाटील यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे.

जयंत पाटील यांनी या आधी मुंबईचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे त्यांना अन्य कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. मात्र जिल्ह्यात सध्या आघाडीची स्थिती मजबूत स्वरूपात आहे आणि ती अजून मजबूत करण्यासाठी अनुभवी नेता म्हणून जयंत पाटील यांना पालकमंत्री पद मिळावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसत आहे. परंतु विश्वजित कदम यांच्या समर्थकांना त्यांना पालकमंत्री पद मिळावे अशी आशा आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/