Yavatmal News : खळबळजनक ! पोलिओचा डोस देण्याऐवजी 12 मुलांना चक्क पाजलं सॅनिटायझर, यवतमाळमधील घटना

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम सुरु असतानाच, यवतमाळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. पोलिओ लसीकरणादरम्यान लहान मुलांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याची घटना घडली आहे. यात १२ बालकांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. १ ते ५ वयोगटातील मुलांना पोलिओची लस देण्यात आली होती. मात्र, अचानक मुलांना उलट्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे १२ बालकांना तत्काळ यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

मुलांना उलट्या होण्याचे कारण तपासले असता पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचे समोर आले. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी रात्री रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची चौकशी केली.

या घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करीत आहेत. दरम्यान, या घटनेबाबत परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.