धक्कादायक ! सॅनिटायझरची नशा करणे बेतले जीवावर, 7 जणांचा मृत्यू, दोघे कोमात

मॉस्को : वृत्तसंस्था – पार्टी दरम्यान दारु संपल्याने पार्टीत झिंग झालेल्या तळीरामांनी नशेसाठी सॅनिटायझर (Sanitizer for intoxication) प्राशन केले. मात्र सॅनिटायझर प्राशन करणे त्यांच्या जीवावर बेतले आहे. यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे कोमात गेले आहेत. शियातील तातिन्सकी जिल्ह्यातील तोमतोर गावामधील एका पार्टीत हा प्रकार घडला आहे.

डेलीमेलमधील रिपोर्टनुसार, रशियातील तातिन्सकी जिल्ह्यातील तोमतोर गावात पार्टी सुरु होती. पार्टी सुरु दरम्यान दारु संपली तरीही लोक मद्याची मागणी करू लागले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या कुणीतरी सॅनिटायझरची बाटली आणली होती. मद्यासाठी आतूर झालेल्या लोकांनी हे सॅनिटायझर पिले. त्यानंतर लोक बेशुध्द होऊन पडू लागले, सर्वत्र एकच गोंधळ उडला. तब्येत बिघडून तीन जणांचा जागीच मृत्यूू झाला. तर सहा जणांना एअरक्राफ्टच्या मदतीने स्थानिक राजधानी याकुत्स्क येथे नेण्यात आले.

त्या ठिकाणी उपचारादरम्यान आणखी चौघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सॅनिटायझरच्या माध्यमातून विषबाधेबद्दल गुन्हा दाखल केला. घटनेनंतर रशियन सरकारने नशा करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे.