संजय दत्तने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत केला खुलासा

मुंबई : वृत्तसंस्था – प्रिया दत्त यांच्यापाठोपाठ आता अभिनेता संजय दत्त देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे वृत्त होते. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चांवर अभिनेता संजय दत्तने स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही असं त्याने ट्विटरवर म्हटलं आहे. संजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती.

ट्विटमध्ये संजय दत्तने म्हंटल आहे की, ‘माझ्याबद्दल सध्या लोकसभा निवडणुकीबाबत अफवा पसरवली जात आहे. मी लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे वृत्त खोटे आहे. पण माझ्या देशासोबत मी खंबीरपणे उभा राहीन आणि माझी बहीण प्रिया दत्त हिलासुद्धा साथ देईन. मी विनंती करतो की आपल्या देशासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावा.’

राज्यसभेचे खासदार आणि मुलायमसिंह यांचे एकेकाळचे निकटवर्तीय अमर सिंह यांच्या आग्रहावरून संजय दत्त यांनी समाजवादी पक्षात २००९ साली प्रवेश केला होता. २००९ साली समाजवादी पक्षाकडून संजय दत्त यांच्या उमेदवारीची घोषणा देखील करण्यात आली होती. परंतु संजय दत्त त्यावेळी निवडणुक लढवली नव्हती.