मुंबईतील डबेवाल्यांसाठी संजय दत्त आला धावून

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनामुळे देशवासीयांची हालत अगदी बिकट झाली आहे. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत इतर राज्यांमधील मजुरांसोबतच मुंबईतील डबेवाल्यांचा देखील विचार करावा अशी विनंती अभिनेता संजय दत्त याने केली आहे. डबेवाल्यांच्या मदतीसाठी सर्वांनी पुढे यावे असे मत त्याने व्यक्त केले आहे. डबेवाले गेल्या अनेक दशकांपासून मुंबईकरांची सेवा करत आहेत.

या प्रतिकूल परिस्थितीत आपण त्यांना मदत करायला हवी. अशा आशयाचे ट्विट संजय दत्तने केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना देखील या ट्विटमध्ये त्याने टॅग केले आहे. संजय दत्तचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांमध्ये शेकडो नेटकर्‍यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास तीन लाखांवर पोहोचली आहे. दरम्यान, कामधंदा ठप्प झाल्यामुळे कामगार गावी पोहचत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.