‘मी परत बुलढाणा शहरात येतोय हिम्मत असेल तर मला अडवून दाखवावे’ – आमदार डॉ. संजय कुटे

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन  –   राज्यात कोरोनामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका आणि आरोप-प्रत्यारोपांचे सत्रही जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी “मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते”, असे विधान केले होते. सोबतच भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर हे संपूर्ण राजकारण पेटले आहे. परिणामी, शिवसेना-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

बुलडाण्यात माजी आमदार विजयराज शिंदे यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे आमदार संजय कुटे यांच्यावरही हल्ला झाल्याची माहिती आहे. आमदार संजय कुटे यांनी ट्विट करून सांगितले की, “माझ्या गाडीवर बुलडाणा येथे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. आता मी संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी बुलडाणा शहर सोडणार नाही, मी परत बुलडाणा शहरात येतोय हिंमत असेल मला अडवून दाखवावे”, असा इशाराच त्यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना दिला आहे. आमदार संजय कुटे हे विजयराज शिंदे यांना भेटण्यासाठी बुलडाण्यात गेले होते. त्यावेळी हा हल्ला झाला.

“संजय कुटेसारखे आमदार दारू पिऊन वावरात पडलेले असतात. त्याला सर्व शौक आहे तो मवाली आहे. तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर ५० मीटर माझ्या जवळ येऊन दाखव तुला संजय गायकवाड काय आहे ते दाखवतो”, अशी धमकी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली होती.

भाजपचे नेते तथा माजी आमदार विजयराज शिंदे १८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जयस्तंभ चौकात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी जमले होते. यावेळी गायकवाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला असता यावेळी आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना त्यास विरोध केला. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची होऊन राडा झाला. त्यावेळी झालेल्या हाणामारीत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, बुलडाण्यातील या घटनेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी मोताळा आणि सिंदखेडराजा येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर बुलडाण्यात भाजपचे माजी मंत्री संजय कुटे यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे सध्या शहरात वातावरण तणावपूर्ण असल्याचे चित्र आहे.