संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आकर्षणाचा बिंदू असलेल्या ‘त्या’ वाघाचा कर्करोगानं मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मुंबईमधील बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये एक दु:खद घटना घडली आहे. नॅशनल पार्कमधील यश या वाघाचा कर्करोगानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नॅशनल पार्कमधल्या टायगर सफारीमधला यश हा एक आकर्षणाचा बिंदू होता. गतवर्षी यशला अत्यंत दुर्मिळ अशा कर्करोगाचं निदान झालं होतं, आणि अखेर बुधवारी त्याचा मृत्यू झाला आहे. संजय गांधी नॅशनल पार्कमधील डॉक्टर शैलेश पेठे यांनी गेल्या वर्षभरात यशवर दोन शस्त्रक्रिया केल्या होत्या अशी माहिती देण्यात आली.

यशला अत्यंत दुर्मिळ कर्करोग झाला होता. विविध प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठवून या रोगाची निश्चिती करण्यात आली होती. त्यानुसार उपचारही करण्यात आले. कर्करोगामुळे त्याच्या खाण्यापिण्यात घट झाली होती तसंच त्याचं वजनही कमी झालं होतं. याच वर्षी मार्चमध्ये डॉ. वाकणकर, डॉ. प्रज्ञा पेठे, डॉ. मनिष पिंगळे व डॉ. अजय देशमुख या तज्ज्ञांनी यशवर तीन तास शस्त्रक्रिया केली व ट्युमरची गाठ काढली होती.

दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बाजीराव या पांढऱ्या वाघाचा वयोमानामुळे तीन मे रोजी म्हणजे याच महिन्यात मृत्यू झाला होता. संधीवात आणि स्नायुदुखीमुळे गेल्या ४ वर्षांपासून त्याला ग्रासले होते. गेल्या दहा ते आकरा दिवसांपासून त्याला चालतानाही त्रास होत होता. उपचारादरम्यान या वाघाचा मृत्यू झाला.