पुरंदरमधून आघाडी कडून संजय जगताप यांना उमेदवारी जाहीर

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) – पुरंदर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून पुणे जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय चंदुकाका जगताप यांची उमेदवारी जाहीर झाली असून अखेर पुरंदर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुरंदर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमदेवारी मिळविण्यासाठी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. पुरंदर विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे लढविण्यासाठी कार्यकर्ते इच्छुक होते. मात्र लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांनी शब्द दिला होता त्यानुसार अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी मध्ये पुरंदरची जागा कॉंग्रेस पक्षाला सोडण्यासाठी शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे यंदा पुरंदर विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार संजय जगताप व युतीकडून विजय शिवतारे यांच्यात जोरदार टक्कर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Visit : policenama.com