एकनाथ खडसेंना राज्यसभेची उमेदवारी द्यायला हवी होती : संजय काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी नाकारली. भाजपने तिकिट नाकारल्यानंतर संजय काकडे यांनी आपली दिल्लीत जायची इच्छा नाही आणि आपल्याला दिल्लीत करमणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच राज्यसभेची उमेदवारी ही एकनाथ खडसे यांना द्यायला हवी होती अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.

भाजपने महाराष्ट्रातील तीन उमेदवार जाहीर केले. यामध्ये रामदास आठवले, उदयनराजे भोसले आणि डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. काल संध्याकाळपर्यंत आपल्या उमेदवारीबद्दल निश्चित असलेल्या काकडे यांच्याऐवजी औरंगाबादमधून भागवत कराड यांना उमेदवारी देण्यात आली.

पत्रकार परिषदेत बोलताना काकडे म्हणाले की, सर्व निर्णय हे दिल्लीत झाले. राज्यातील नेत्यांचे म्हणणे लक्षात घेतले नसावे. त्यामुळे मला उमेदवारी मिळाली नाही. मात्र मला डावलेलं नाही असे काकडे यांनी सांगितले. पक्षात 8-10 जण इच्छुक होते. मी देखील सहयोगी होतो. त्यामुळे पक्षाने जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली, असं आपल्याला पक्षाकडून सांगण्यात आले. दु:ख याचेच होत आहे की खडसेंना उमेदवारी द्यायला हवी, त्यांच्यावर अन्याय झाला, अशी भूमिका त्यांनी मांडली. उदयनराजे यांच्या उमेदवारीवर बोलताना काकडे म्हणाले, वरिष्ठांनी त्यांना शब्द दिला होता. तर रामदास आठवले हे मंत्री आहेत त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार होती. दोन एप्रिल पर्यंत मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे. त्यानंतर भाजप सदस्य होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.