अभिनेता संजय खान यांनी दोनदा दिला मृत्यूला चकवा, एकदा आगीत होरपळले अन् एकदा हेलिकॉप्टर झाले क्रॅश !

पोलीसनामा ऑनलाईनः हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा अनेक भूमिका वठवणारे संजय खान (sanjay khan) यांचा आज (3 जानेवारी) वाढदिवस. संजय खान यांनी 1964 मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर 3 दशकांच्या करिअरमध्ये त्यांनी 30 चित्रपटांत काम केले. तसेच त्यांनी काही मालिकांमध्येही काम केले. संजय खान (sanjay khan) यांनी आपल्या आयुष्यात दोनवेळा मृत्यूला चकवा दिला आहे. एकदा मालिकेच्या शुटींग दरम्यान सेटवर आग लागल्याने ते गंभीरपणे भाजले होते. त्यानंतर ते एकदा एका हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्यात वाचले होते.

संजय खान यांनी दिग्दर्शित केलेली मालिका म्हणजे द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान या मालिकेत ते मुख्य भूमिकेत होते. 8 फेबु्वारी 1990. टीपू सुल्तान या मालिकेचे शूटींग सुरु होते. अचानक सेटवर आग लागली. यावेळी सेटवर 40 लोक हजर होते. या आगीत संजय खान यांचे शरीर गंभीरपणे होरपळले होते. ते 65 टक्के भाजले होते. जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले. यानंतर 13 दिवसांत त्यांच्यावर 73 शस्त्रक्रिया झाल्या.

एका मुलाखतीत संजय खान यांनी या अपघाताबद्दल सांगितले होते की, एवढी भीषण घटना घडले याची आम्हाला कल्पना नव्हती. मी आमच्या लेखकासोबत स्टुडिओ बाहेर असताना आग लागल्याचे आम्हाला कळले. आम्ही पोहोचलो तेव्हा सगळीकडे आगीचे लोट होते. मी जोरात आरेडला आणि दरवाजा उघडला. याचदरम्यान माझ्या डोक्यावर काहीतरी जोरात आदळले. यानंतर काय झाले हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, असे त्यांनी सांगितले.

या अपघातानंतर डॉक्टरांनी संजय खान यांना अभिनय सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र संजय खान यातून लवकरच बरे झालेत. यानंतर आपल्या लहान भावासोबत त्यांनी प्रॉडक्शन हाऊसचे काम सांभाळले. त्याआधी संजय खान एका हेलिकॉप्टर दुर्घटनेतून असेच थोडक्यात बचावले होते. 2003 साली त्यांचे हेलिकॉप्टर अनेक फूट उंचीवरून खाली कोसळले होते. म्हैसूरमध्ये ही घटना घडली होती. या दुर्घटनेतून संजय खान अगदी थोडक्यात बचावले होते.