राजीनाम्यानंतर राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हंटले – ‘… म्ह्णून द्यावा लागला राजीनामा’

मुंबई, पोलिसनामा ऑनलाईन : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर शिवसेना नेते संजय राठोड यांनी वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘आपण आमदारकीचा राजीनामा दिला नाही, तर केवळ मंत्रिपद सोडल्याच संजय राठोड यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवसेना नेते म्हणाले की, ‘पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, ही माझी मागणी कायम आहे. परंतु विरोधकांनी अधिवेशन चालू होऊ देणार नाही, हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे, असा सूर लावून धरला, त्यामुळे मला पदापासून दूर होण्याचा निर्णय घ्यावा लागला”

राठोड यांनी राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हंटले कि, “मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. यावेळी अनिल परब, अनिल देसाई माझ्यासोबत होते,आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. मात्र या घटनेनंतर विरोधी पक्षांनी प्रसार माध्यमातून घाणेरडं राजकारण केलं. मीडियातून माझ्या समाजाची, माझी वैयक्तिक बदनामी करत मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीस वर्षांपासून मी केलेल्या राजकीय आणि सामाजिक कामावर चिखलफेक करण्यात आली. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं, ही माझी भूमिका आहे.”

वर्षा बंगल्यावर घडलं असं राजीनामा नाट्य….

संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह दुपारी अडीचच्या सुमारास वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावेळी, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारावा अशी विनंती राठोड यांनी केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र चर्चा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास विरोध केला. राठोड यांनी पोहरादेवीच्या महंतांशी बोलण्याची विनंती केली, मात्र मुख्यमंत्र्यांनी चर्चेला नकार देत मला माझा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका घेतली. माहितीनुसार, पोहरादेवीच्या महंतांनी पुन्हा एकदा राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही चौकशीशिवाय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असं आवाहन महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केलं होतं.

दरम्यान, आज संध्याकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपविला. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्री पदाचा तात्पुरता कारभार कोणाकडे जाणार याचा निर्णय तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील. मात्र यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचं म्हंटल जात आहे. तर संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी चौकशी बसवली जाणार असल्याचं म्हंटल जात आहे. यानुसार राठोड यांचीही चौकशी केली जाईल. त्यात राठोड दोषी आढळल्यास त्यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.