पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राठोड यांनी जोडले हात अन् म्हणाले…

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन –   पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून गायब असलेले संजय राठोड हे पोहोरादेवी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी याप्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केले.

संजय राठोड म्हणाले, ‘माझं आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणात घाणेरडं राजकारण झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याबाबतचे सत्य चौकशीतूनच समोर येईल. मला आज काही बोलायचं नाही. पण माझे काम यापुढेही सुरुच राहणार आहे आणि मी माझ्या मुंबईच्या घरातून काम करतच होतो. राजकारण चुकीचे आणि निराधार आहे’, असेही ते म्हणाले.

दरम्यान, माझ्या कुटुंबियांची बदनामी थांबवा, अशी हात जोडून विनंती करतानाच ते पुढे म्हणाले, मला एका घटनेमुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणाचे सर्वांना दु:ख आहे आणि त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले चौकशीचे आदेश

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता पोलिसांचा तपास सुरु आहे. या तपासानंतर सत्य लवकरच स्पष्ट होईल. राजकारण चुकीचे आहे. यावरून माझे आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.

राठोड यांनी चौकशीला सामोरे जावे

पोहोरादेवी मंदिरात संजय राठोड आल्यानंतर त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीला सामोरे जावे, असे पोहोरादेवीचे महंत यांनी सांगितले आहे.