पोहरादेवी येथील गर्दीवर होणार कारवाई, CM ठाकरेंनी दिला आदेश

वाशीम : पोलीसनामा ऑनलाईन  –  राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. मात्र असे असताना त्यांच्याच मंत्रीमंडळातील वनमंत्री संजय राठोड यांनी नियमांचे उल्लंघन करत मंगळवारी (दि. 23) पोहरादेवी गडावर गर्दी जमवली. या प्रकरणी विरोधकांकडून आरोप होत असल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांनी गंभीर दखल घेत गर्दीबाबत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा व पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप होत असलेले संजय राठोड यांनी अखेर पंधरा दिवसांनी मंगळवारी (दि. 23) पोहरागडावर सर्वासमोर आले. यावेळी राठोड यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. तसेच घरातून निघाल्यानंतर त्यांच्यासोबत मोठ्याप्रमाणात गाड्यांचा ताफादेखील होता. कोरोना संकटकाळातही आरोग्याचे नियम न पाळता गर्दी केल्याप्रकरणी संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना याचा अहवाल देण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.