संजय राठोड आज जाणार पोहरादेवीत; पूजा चव्हाण प्रकरणात काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष

यवतमाळ : गेली १५ दिवसांहून अधिक काळ गायब झालेले वनमंत्री संजय राठोड हे आज पोहरादेवीत येणार आहेत. पूजा चव्हाण हिने ७ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. त्यानंतर संजय राठोड हे नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर सोमवारी रात्री ते यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी असल्याचे आढळून आले.

संजय राठोड हे आज सकाळी ९ वाजता पोहरादेवीकडे निघणार आहे. पोहरादेवी येथे ते साडेअकरा वाजता पोहतील. यावेळी ते पूजा चव्हाण प्रकरणी काय भुमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राठोड यांचा शासकीय कार्यक्रम जाहीर झाला आहे़. पूजा चव्हाण प्रकरणी भाजपकडून संजय राठोड यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टिका केली जात असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली आहे. एखादा मंत्री १५ दिवस कसा काय नॉट रिचेबल राहू शकतो, याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही खुलाशाची मागणी केली गेली आहे.

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात अनेक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यातून संजय राठोड यांच्याशी तिचा संबंध जोडला जात आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येची दखल घेतली आहे.

पोहरादेवी हे बंजारा समाजाचे दैवत आहे. आज त्याठिकाणी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत याग आयोजित करण्यात आला आहे. संजय राठोड हे आपल्या समर्थकांसह तेथे येणार आहेत. तेथे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मनोरा पोलिसांनी पोहरादेवी विश्वस्तांना नोटीस बजावली असून मंदिरात केवळ ५० जणांना परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.