पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी करा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण उघड झाल्यापासून गायब झालेले संजय राठोड आज माध्यमांसमोर आले आणि त्यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र, संजय राठोड यांचे स्पष्टीकरण नसून थोतांड आहे. ज्या पक्षाचे ते मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे सरकार असल्यामुळे निष्पक्ष चौकशी होईल ही अपेक्षा ठेवावी तरी कशी? संजय राठोड यांची यांची CBI चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गायब असलेले मंत्री संजय राठोड यांनी 15 दिवसानंतर मंगळवारी (दि. 23) समोर येऊन या प्रकरणी भाष्यं केले आहे. पोहरादेवी गडावर जाऊन राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती. त्यानंतर राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल असे म्हटले आहे. या प्रकरणी प्रसाद लाड यांनी राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि CBI चौकशी करावी असे विनंती पत्र ठाकरे सरकारला दिले आहे.