देशात मंदीमुळे बेरोजगारी वाढली, काँग्रेसने देशाला मंदीतून बाहेर काढलं होतं ; संजय राऊत यांचा सरकारला घरचा आहेर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच जाहीर झालेल्या RBI च्या अहवालानुसार भारताला आर्थिक मंदीचा फटका बसल्याचे उघड झाले आहे. मागील ५ वर्षांत रुपयाचे मूल्य तब्बल २० टक्क्यांनी घसरले आहे. अशातच शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारला घरचा आहेर देत सनसनाटी विधान केले आहे. ते म्हणाले ‘सध्या देशात आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढत आहे त्यामुळे रशिया सारखी परिस्थिती होऊ नये यासाठी आर्थिक मंदीवर सरकारने लवकर उपायोजना कराव्यात.’ यावेळी त्यांनी विरोधी पक्ष काँग्रेसचा दाखल देत त्यांचे कौतुकही केले. ते म्हणाले, ‘काँग्रेसच्या काळात देखील मोठी मंदी आली होती. काँग्रेसने त्यांच्या काळात उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढलं होतं.’ ते नाशिक येयचे बोलत होते.

सरकारच्या कमकुवत आर्थिक धोरणांवर टीका करणारच
राऊत यांनी याआधीदेखील मंदीच्या मुद्द्यावरून सरकारला टार्गेट केलं होतं. सरकारच्या कोणत्याही निर्णयानं जर रोजगार जात असेल तर असा निर्णय लोकांच्या दृष्टीनं घातकच आहे, असा आरोप राऊत यांनी केला होता. आर्थिक मंदीकडे आणि बेरोजगारीकडे सरकारचं लक्ष नसल्याचे म्हणत सत्तेत असलो तरी सरकारच्या कमकुवत आर्थिक धोरणांवर टीका करणारच असल्याची खंबीर भूमिका त्यांनी घेतली होती. महाराष्ट्रातल्या उद्योगांवरही मोठं संकट असून मुख्यमंत्र्यांनी यावर भूमिका घेतली पाहिजे असे त्यांनी म्हटले होते.

विधानसभा निवडणुकीत समान जागा वाटप होणार ?
राऊत यांनी यावेळी जागावाटपाविषयीही भाष्य केले. ते म्हणाले, ‘येणाऱ्या निवडणुकीत समान जागा वाटप होणार असल्याचे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरलं आहे. भाजप राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेत आहे. आम्ही देखील तयारी करत आहोत. शिवसेनेमध्ये मुलाखत होत नाही. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त बैठका होतात.’ गणेशोत्सवानंतर कधीही निवडणुका लागतील.उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांतील नेत्यांशी आज चर्चा केली असल्याचे ते म्हणाले. राज्यातील राजकारणात सध्या उत्तर महाराष्ट्र केंद्रबिंदू आहे असेही त्यांनी यायला स्पष्ट केले.

आरोग्यविषयक वृत्त