राऊत-फडणवीस भेटीची उमटले शिवसेनेत पडसाद, भाजपसोबत जाण्याबद्दल नेत्यांनी उपस्थित केला प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, संजय राऊत यांनी घेतलेल्या या गुप्त भेटीमुळे शिवसेनेत नाराजीचे सूर उमटत आहेत. यासंदर्भातील वृत्त एका मराठी वर्तमानपत्राने दिलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नाहक बदनामी भाजपने केली आणि त्याचंच सोबत परत कशाला जायचे, असा सवाल सेनेच्या काही नेत्यांनी विचारला आहे. तसेच आदित्य यांच्यासाठी भाजपवर टीका करणारे संजय राऊत यांना याची थोडी सुद्धा जाणीव नाही का ? असे टीकास्त्र काही मंत्र्यांनी सोडलं आहे.

तथापि, राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीने राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर शिवसेनेला वचक ठेवता येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये तसे निदर्शनास सुद्धा आलं आहे. महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार यांनी याबाबत तातडीने बैठक घेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात देखील हजर होते.

संजय राऊत यांचा खुलासा

संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेट ही गुप्त नव्हती. ‘सामाना’च्या मुलाखतीसाठी त्यांची भेट घेतली. गप्पा मारल्या, एकत्र जेवण केलं. मुळात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कुणीही कुणाचे शत्रू नाही. देवेंद्र फडणवीस सुद्धा हे आमचे कायमचे शत्रू नाही. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांना आपला नेता मानतात आणि मी देखील मानतो’ असे राऊत यांनी नमूद केलं.

शिवसेनेसोबत जाणार नाही – फडणवीस

‘संजय राऊत यांच्या भेटीने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची कोणीतही चर्चा झाली नाही. त्यासाठी ते कोणतेही कारण नाही’ असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच ‘ठाकरे सरकारचे जे काम सुरु आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड राग. म्हणून हे सरकार आपल्या कृतीमुळे पडेल, जेव्हा हे सरकार पडेल तेव्हा आम्ही बघू. पण सरकार बनवण्याची सध्या कोणतीच घाई भाजपाला नाही’, असे सुद्धा फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं.