खा. संजय राऊतांची गमिनी काव्याने मध्यरात्रीच बेळगावात ‘एन्ट्री’ !

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  बेळगावात हुतात्मांना अभिवादन करण्यापासून रोखण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मी बेळगावात जाणारच, कर्नाटक पोलिसांनी कायद्याने रोखून दाखवावे, असे आव्हान दिले होते. त्यांना रोखण्याची घोषणा कर्नाटक वेदिका रक्षक संघटनेने केली होती.

असे असताना ठरलेल्या कार्यक्रमानुसार संजय राऊत हे शनिवारी सकाळी येणार असताना त्यांनी मध्यरात्रीच बेळगावात दाखल होत सर्वांना चकवा दिला आहे. पुण्यातील एका मुलाखतीतील विधानाने संजय राऊत यांच्या विरोधात संपूर्ण राज्यात निषेध आणि बंद आयोजित केले गेले होते. बेळगावात ते काय बोलणार याविषयी त्यामुळे उत्सुकता आहे. त्याचबरोबर बेळगाव पोलीस त्यांना भाषण करुन देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बेळगाव तरुण भारत या वृत्तपत्राच्या वतीने बेळगावात नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे शुक्रवारी बेळगावात हुतात्मांना अभिवादन करण्यासाठी गेले असताना अभिवादन करण्याच्या स्थळापासून १० फुट अंतरावर पोलिसांनी यड्रावकर यांना हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यास अटकाव करुन धक्काबुक्की केली.

यड्रावकर यांना ताब्यात घेऊन खासगी वाहनातून पोलीस आयुक्तालयाकडे नेले आणि तेथून त्यांना कोगनोळी इथे नेऊन सोडले होते. कर्नाटक सरकारने संजय राऊत यांना बेळगावात येण्यास बंदी घातली. मात्र मी बेळगावात जाणारच अशी भूमिका राऊत यांनी घेतली होती. त्यानुसार ते मध्यरात्रीच बेळगावात दाखल होत सर्वांना चकवा दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like