Sanjay Raut : बाळासाहेब असताना राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत, पण आता…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र बिंदू पुणे राहिले आहे. बाळासाहेब होते तोपर्यंत मुंबईत होता, असेही त्यांनी पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले.

संजय राऊत म्हणाले, “राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तेव्हा सरकार मध्ये असणारे जेष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत. पंतप्रधान मोदीजी तिकडे अन्य राज्यांना मार्गदर्शन करतात, सल्ले देतात. सरकार शरद पवार यांचा सल्ला घेत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतंय, अशी विचारणा त्यांनी केली. तद्वतच, पवारांचा सल्ला घेतला नाही तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असे म्हणत, राज्यपालांनाही पवारांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे. म्हणून मी पवारांना विनंती करतो त्यांनाही सल्ला देण्याची,” असा टोला राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे.

“आमचे राजकीय हिंदुत्व नाही, राजकारणासाठी आजवर कधीच वापर केला नाही. आजही शिवसेना आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका मांडते. घंटा बडवल्या, शेंडी-जानवे ठेवले म्हणजे हिंदुत्व नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

“मागचा काही काळ संकटाचा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जागी दुसरे कोण असते तर वेगळे काही घडले नसते. किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण लढाई चांगल्या प्रकारे लढली गेली. त्याचप्रमाणे राज्यातील विरोधी पक्ष मजबूत आहे. काहींना विरोधी पक्ष असूच नये, असे वाटते. पण सक्षम लोकशाहीत चांगला विरोधी पक्ष असलाच पाहिजे,” असे राऊत यांनी नमूद केलं.