संजय राऊतांचे विरोधकांना भावनिक आवाहन; म्हणाले – ‘आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. कोरोना लसींचा तुटवडा, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता जाणवत आहे. मात्र, विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यावरून आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना आवाहन केले आहे. ‘आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका’, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात घेतला. त्यापूर्वी त्यांनी पहिला डोस दिल्लीत संसद भवनात घेतला होता. आज त्यांनी मुलुंड येथे हा डोस घेतला. त्यानंतर त्यांनी विरोधकांना आवाहन करत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढवायला हवी. मात्र, लसीकरणावरून राजकारण करू नका. देशभरात कोरोनाग्रस्तांच्या चिता जळत आहेत. त्या बघा आणि शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळून टाका’.

दरम्यान, ठाकरे सरकारने राज्यात 15 दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. यासह इतरही अनेक निर्बंध लावले आहेत. त्यावरून विरोधकांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनी यावर भाष्य करत विरोधकांनी कोरोना परिस्थितीत राजकारण करू नये, मुख्यमंत्र्यांना साथ द्या, सहकार्य करा, असे आवाहन केले आहे.

‘लस सुरक्षित, सर्वांनी घ्यावी’
देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु झाले आहे. त्यानुसार आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी लस घेतली आहे. संजय राऊत यांनीही लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यावर ते म्हणाले, लस सुरक्षित आहे. सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी लस घ्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.