शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले – ‘विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे आता बंद करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनात तेल ओतण्याचा प्रयत्न करत भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यावरून आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे आता बंद करा. पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, पण तुमच्यासाठी ते स्वस्त झाले आहेत काय? आगीत ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्तात तेलपुरवठा करतंय का ? असा सवाल करत शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. पुढे ढकलेली परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. सरकारने तातडीने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आनंदी झाले असून या प्रश्नी राजकारण करू पाहणाऱ्यांची थोबाडे मात्र आंबट झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मदत व पुनर्वसन विभागाने एमपीएससीला कोरोनाच्या स्थितीबाबत पत्र पाठवले. त्यावर आयोगाने सचिव स्तरावर निर्णय घेतला. त्या निर्णयाविरुद्ध उद्रेक झाला तेंव्हा आयोग अन् सचिव मंडळ पळून गेले व आग विझवायला मंत्र्यांनाच समोर यावे लागले. सचिवांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती मंत्र्यांना नव्हती. त्यातून गोंधळ निर्माण झाला. त्या गोंधळाचे नेतृत्व भाजपने करण्याचा मोका साधला, तेंव्हा मुख्यमंत्र्यांना पुढे येऊन हस्तक्षेप करावा लागला. यावरून सरकारवर शेरे-ताशेरे मारले जात आहेत.

कारण कोरोनाचे असो अथवा इतर काही असो, पण एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलल्याने वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या तरुणांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत असते. आधीच देशभरात नोकऱ्यांचा दुष्काळ आहे. पदवीधरांना नोकऱ्या मिळत नसतील तर त्यांनी ‘पकोडे’ तळावेत, हाच रोजगार असल्याची भूमिका पंतप्रधान मोदी आणि अमित शहा मांडतात. पण मोदी राज्यात पकोडे तळणाऱ्यांचेसुद्धा वांधेच झाले आहेत. देशातील वाढत्या बेरोजगारीचे मूळ केंद्र सरकारच्या बिनडोक आर्थिक धोरणात आहे. विरोधी पक्षाने जहाल व्हायला हवे ते बेरोजगारीच्या मुद्द्यावर, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष विद्यार्थ्यांना जमवून भिकार राजकारण करीत आहे. विद्यार्थ्यांची माथी भडकवून त्यांना सरकारविरुद्ध लढायला भाग पाडत आहे.

अशाने सरकार पडेल या भ्रमात कोणीही असेल तर त्यांनी डोळ्यांवर थंड पाणी मारून जागे व्हावे हेच बरे. आपले सरकार 3 महिन्यांत येईलच येईल, असे भाजप पुढारी जागेपणी बडबडत आहेत. राज्यात कोरोना वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच चिंता व्यक्त केली. हे संकट असेच वाढले तर लॉकडाऊनचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामागची भावना विरोधी पक्षाला समजत नाही का, नागपुरात लॉकडाऊन करावे लागत आहे. ही वेळ का आली, कोणामुळे आली, कोणामुळे आली? या प्रश्नांची उत्तरे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोधायची आहेत. एका बाजूला कोरोना वाढतोय म्हणून सरकारला दोष द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला कोरोना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली तर सरकारचे पाय ओढायचे, असे आपल्या विरोधी पक्षाचे चालले आहे. एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांचे धोरण दुटप्पीच असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.