‘संजय राऊत कुणाच्या सांगण्यावरून BJP च्या नेत्यावर टीका करतात; हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीय’

पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून निशाणा साधला. यावरून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत कुणाच्या सांगण्यावरून भाजपाच्या नेत्यांवर टीका करून भाजपाचे वरिष्ठ नेते व उद्धव ठाकरे यांच्यातील दरी वाढवण्याचे काम करीत आहेत? खरं तर, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यांनी विनाकारण संपूर्ण माहिती न घेता, अभ्यास न करता, अज्ञानातून भाजपाच्या नेत्यांबाबत लिखाण करण्याचे काम आता थांबवावे, अशी टीका काकडे यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मोदी-शहा का हरले हा लेख लिहून स्वत:च्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. राऊतांनी अभ्यासपूर्ण लिखाण करावे ही अपेक्षा आहे. डोळ्यावर पट्टी बांधून लिखाण केल्यामुळे राऊतांना मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये मिळालेले यश दिसले नाही. अर्धवट माहितीवर व राजकीय अपरिक्वतेतून लिखाण करू नये. वास्तविक गेल्यावेळच्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपाने फक्त 3 जागा जिंकल्या होत्या 2021 च्या आता झालेल्या निवडणुकीत भाजपाने 77 जागेवर विजय संपादन केला. त्यामुळे ही आकडेवारी पाहिली तरी भाजपाने मोठे यश प्राप्त केल्याचे समजून येईल. परंतु, डोळ्यावर पट्टी बांधलेल्या राऊतांना ते कसे दिसेल? राजकीय परिपक्वता न ठेवता याकडे बघत असल्याने राऊतांना हा फरक कदाचित लक्षात येत नसावा, असे काकडे यांनी म्हटले आहे.

तसेच आमच्यासोबत 30 वर्षे युतीत राहिलेल्या राऊतांनी कुणाच्या विजयाचा आनंद मानावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु ते जो आनंद व्यक्त करत आहेत. त्या बंगालमधील निवडणुकीची वस्तुस्थिती त्यांनी लक्षात घ्यावी आणि मग लिहावे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बहुमतात सरकार आले. मात्र तिथे काँग्रेस व कम्युनिस्ट शून्य झाले. त्यांची मते ममता बॅनर्जी यांच्या मागे लावली. मात्र, वैचारिक मतभेद असलेल्या काँग्रेसचा पराभव करण्यात आणि त्यांना शून्य करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. याचा आम्हाला आनंद आहे. राऊतांनी शिवसेना भाजपाबरोबर असताना त्यांचा आलेख कसा होता आणि आता कसा आहे? याचादेखील वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडावा. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला काय मिळाले? एक मुख्यमंत्रीपद व नगरविकास खात. परंतु, सत्ता एकवटली आहे ती राष्ट्रवादी-काँग्रेसच्या हातात, असा टोला काकडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.