‘आता नरेंद्र मोदी सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले’ – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आल्याने सध्या, सर्व स्तरातून नरेंद्र मोदींवर सडकून टीका होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही आता या नामकरणावरून नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

ते म्हणाले, प्रत्येक राज्यात अशा प्रकारे अनेक नेत्यांची नावे दिली जातात. राज्यातील सरकार आणि क्रिकेट संघटनेने या स्टेडियमला नाव देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे नरेंद्र मोदी आता मोठे नेते झाले आहेत ते इतके मोठे झाले आहेत की, सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत. अशा शब्दात त्यांनी सुनावलं. अशा निर्णयांबाबत एखादा राजकीय पक्ष किंवा सरकार फार काही बोलू शकत नाहीत. असेही ते म्हणाले.

दरम्यान, बुधवारी जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमच औपचारिक उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. आतापर्यंत मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर नरेंद्र मोदी स्टेडियम असर करण्यात आला आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे.