‘त्या’ महिलेने केलेल्या गंभीर आरोपावरून संजय राऊत यांनी कोर्टात केलं ‘हे’ स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर केलेले छळवणुकीचे आरोप फेटाळून लावले आहेत. तर त्या महिलेने तिच्या कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या गैरसमजमुळे विनाकारण माझ्यावर आरोप केले आहेत, असा स्पष्ट खुलासा खासदार संजय राऊत यांनी मुंबई हाय कोर्टात केला आहे.

दरम्यान, मुंबईतील एका उच्चशिक्षित महिलेने संजय राऊत यांच्यावर छळवणुकीचे आरोप केले होते. अशी तक्रार त्या महिलेने कोर्टात केली होती. तर याची सुनावणी न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी कोर्टात राऊत यांच्या वकिलांनी त्या महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले. तर ‘महिलेसोबत माझे आधीपासून कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तिला आणि तिच्या पतीला मी पूर्वीपासून ओळखतो. त्या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादात मी पतीची बाजू घेतोय, असं वाटत असल्यानं तिनं माझ्याविरोधात विनाकारण आरोप केले आहेत, असा दावा संजय राऊत यांच्यामार्फत करण्यात आला आहे.

तसेच महिलेनं २०१३ पासून पोलिसांत तीन FIR नोंदवले आहेत. ही खूप जुनी प्रकरणं आहेत. एकाही FIR मध्ये माझं नाव नाही. २०१३ मध्ये वाकोला पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या FIR प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले, तर नंतरच्या अन्य दोन FIR प्रकरणात पोलिसांनी ‘ए समरी’ अहवाल दाखल केले आहेत. तरीही महिलेला काही आक्षेप असतील तर त्या महिलेने न्यायदंडाधिकारी कोर्टात जायला हवं’, असं म्हणणं संजय राऊत यांच्या वकिलांनी मांडलं आहे. याचिकादारानं आरोपपत्रातील आरोप तपासून पाहावेत आणि त्यानंतर म्हणणं मांडावे असे निर्देश देत पुढील सुनावणी १९ मार्चला असल्याचं कोर्टाने सांगितलं आहे.

काय होते त्या महिलेचे आरोप?

तर २०१३ पासून माझी छळवणूक सुरू आहे. माझ्या मागे माणसे लावली जात आहेत आणि माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. परंतु पोलिसांनी माझ्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही. कारण संजय राऊत यांच्याविरोधात मी आरोप केले आहेत. आता कुठे मी याविरोधात न्यायालयात येण्याची धाडस दाखवली आहे.