खा. संजय राऊतांवर यशस्वी शस्त्रक्रिया, तब्बल सव्वा तास चालली सर्जरी, सध्या ICU मध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेेचे फायरब्रॅंन्ड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) यांच्यावर गुरुवारी (दि. 3) यशस्वी अँजिओप्लास्टी सर्जरी (angioplasty surgery) करण्यात आली आहे. लिलावती रुग्णालयात तब्बल सव्वा तास ही सर्जरी चालली असून सध्या राऊत आयसीयूमध्ये (ICU) आहेत. त्यांना त्याठिकाणी अंडर ऑब्झरर्व्हेशन ठेवण्यात आले आहे.

खासदार राऊत यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी झाली आहे. हृदयासंबंधी त्रास पुन्हा सुरू झाल्यानंतर बुधवारी (दि. 2) दुपारी त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये (Leelavati Hospital mumbai) दाखल केले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मॅथ्यू आणि डॉ. अजित मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात खा. राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घातल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल 2020 ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलली होती. मात्र, राऊत यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांना ताण आणि थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा अँजिओप्लास्टी
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यामध्ये सरकार स्थापनेबाबत गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये बैठक झाली होती. या बैठकीला राऊत हे देखील उपस्थित होते. त्याचवेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते. तपासणीनंतर त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेजेस असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर पहिल्यांदा अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला होता.